मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे पावसाळी शिबीर - २००९
 

'कबड्डीला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करुन देत असताना संघटकांनी हॉकी सारखी आपली गत होणार नाही याची काळजी घ्यावी' असा सुचक इशारा दिपक गव्हाणकर यांनी मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या पावसाळी शिबीराचे उदघाटन करताना दिला. गव्हाणकर वाडा, भालिवली, विरार (पूर्व) येथे संघटनेचे उपाध्यक्ष मारुतीराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पावसाळी शिबीरात वर्षभराच्या कार्यक्र्माची आखणी व कबड्डीच्या विकासाच्या दृष्टीने अनेक विषयांवर सखोल चर्चा करुन ठोस निर्णय घेण्यात आले.

दोन दिवस चाललेल्या या शिबीरात कबड्डी खेळाडुंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नोंदणीकृत खेळांडूची विमा पॉलिसी असावी यावर बराच खल करण्यात आला. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त फायदा खेळाडूंना कसा मिळवून देता येईल याकरिता सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. मुंबई शहरच्या सुवर्ण महोत्सवानिमीत्त संघटनेची आर्थिक स्थिती मजबुत करण्यासाठी वर्षभरात एखादा मनोरंजनाचा कार्यक्रम घेण्याचे ठरले. कबड्डी आमने-सामने हा सर्वांशी थेट संवाद साधणारा कार्यक्रम घेण्याचे ठरले असुन त्यायोगे सर्व क्रीडा क्षेत्रातील तज्ञ, पत्रकार, कबड्डीतील कार्यकर्ते, संघटक, खेळाडू, आहारतज्ञ, मानसोपचारतज्ञ आदी निवडक व्यक्तींना निमंत्रित करुन कबड्डी खेळ व खेळाडु यांच्या विकासाच्या दृष्टीने सांघिक प्रयत्न करणे या महत्त्वपूर्ण विषयांबरोबरच संघटनेच्या सब-कमिट्या व निवड समित्या गठित करण्यात आल्या. शिबीरात नवनविन उपक्रमांचे सादरीकरण संघटनेचे प्रमुख कार्यवाह मिनानाथ धानजी यांनी मार्गदर्शक चित्रांद्वारे केले.

शिबीराचे उदघाटन दिपक गव्हाणकर यांच्या हस्ते झाले तद्प्रसंगी मु. शा. शि. मं. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पारगांवकर सर, भारत पेट्रोलियमचे सुधाकर घाग, संघटनेचे कार्याध्यक्ष राजाराम पवार, कार्योपाध्यक्ष संजय शेटे आदी मान्यवर उपस्थित होते. पारगांवकर सरांनी शिबीरांस संबोधित करताना कबड्डी हा खेळ सर्व स्तरावर व  इतर देशात पोचविताना चार गोष्टी कटाक्षाने पाळावयास हव्यात. १) व्यवस्थित आखणी, २) प्रत्यक्षात कृती, ३) आपण केलेल्या गोष्टीची उजळणी किंवा फेरतपासणी, ४) ते करीत असताना चुका कमीत कमी कशा होतील याची दक्षता घेणे.

संजय शेटे यांनी शिबीराची सांगता करताना असे सांगितले की खेळाडूंना जास्तीत जास्त नोकर्‍या कशा उपलब्ध होतील ते पाहिले पाहिजे काळाबरोबर आपण देखील बदल स्विकारवयांस हवेत. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन लोकांना नवनवीन कल्पना सादर करावयांस हव्यात. शिबीराचे सुत्रसंचलन मिनानाथ धानजी यांनी केले तर उपस्थितांचे आभार मनोहर इंदुलकर यांनी मानले. शिबीर यशस्वी करण्याकरिता दिपक गव्हाणकर, भारत पेट्रोलियमचे सुधाकर घाग व त्यांचे सहकारी, प्रभाकर अमृते, शरद कालंगण, भरत मुळे, मधु पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.

शिबीराची सांगता झाल्यानंतर त्याच ठिकाणी संघटनेच्या कार्यकारी मंडळाची सभा कार्याध्यक्ष राजाराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येऊन शिबीरात घेतलेल्या निर्णयांवर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.

 
नोंदणी सार्वजनिक विश्वस्त अधिनियम - १९५०